पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात होत असलेल्या खुलेआम गुटखा विक्रीचा छावा संघटनेने निषेध करत गुटख्याची होळी केली. काळेवाडी येथे झालेल्या या आंदोलनाला मोठ्या संख्येने पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी शहरातून गुटखा संपवण्याची शपथ घेतली.
राज्यात गुटखा बंदी असताना पिंपरी चिंचवड शहरात सर्रास गुटखा विक्री चालू आहे. अनेक युवक हे व्यसनाच्या आहारी जात आहेत. या व्यसनामुळे तरूण एक प्रकारे मृत्यूच्या दारातच जात आहेत. त्यामुळे खुलेआम सुरू असलेल्या गुटखा विक्रीच्या विरोधात छावा संघटनेने शहरातील गुटखा संपवण्याची शप्पथ घेतली. काळेवाडी येथे करण्यात आलेल्या आंदोलनात गुटख्याच्या पुड्यांची होळी करण्यात आली.
छावा संघटना येणार्या काळात गुटखा विरोधी मोहीम तीव्र करणार असल्याचे छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी यावेळी सांगितले. गुटखा विक्री बंद झालीच पाहिजे नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबलाच पाहीजे, अशा घोषणा देत गुटख्याची होळी करण्यात आली. यावेळी शेकडो तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.