पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही मतदार संघात दि.२ एप्रिल २०२३ रोजी ‘सावरकर गौरव यात्रा’ आयोजित केली आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी आणि सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्यासाठी भाजप-शिवसेना राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार आहे. त्याचपद्धतीने खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाच्या मुद्यावरून महायुतीच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ‘आम्ही सारे सावरकर’ अशी मोहीम राबविली आहे. राज्यातील सर्व मंत्री आणि नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलमध्ये ‘आम्ही सारे सावरकर’ असा प्रोफाईल पिक्चर ठेवला आहे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने अपमान करीत आहेत. यामुळे राज्यातील जनतेमध्ये असंतोष आणि चीड पसरली आहे. या असंतोषाला वाट करून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढून सावरकरांच्या त्यागाची माहिती जनतेपर्यंत पोचविली जाणार आहे.