पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका विधी समितीच्या सभेमध्ये अजेंड्यावरील विषय तहकूब करून ऐनवेळचे विषय मंजूर केले जात आहेत. ऐनवेळचे विषय घेण्यामध्ये ‘विधी’चे सभापती राजकारण करत आहेत. त्यामुळे यापुढे ‘विधी’, स्थायी समितीसह कोणत्याही विषय समितीत एकही ऐनवेळचा विषय घेऊ नयेत. अन्यथा या विरोधात न्यायालयात जाऊ, आंदोलने करु असा, इशारा शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी दिला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कलाटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत अजेंड्यावर असलेले दोन विषय तहकूब करण्यात आले. तर, ऐनवेळचे सहा विषय सभेसमोर ठेवण्यात आले होते. परंतु, सहा विषयांपैकी विधी समितीने पाच ऐनवेळचे विषय मंजूर केले. तर, एकच विषय जाणीवपूर्वक वगळण्यात आला. विधी समितीच्या सभापती हे जाणीवपूर्वक करत असल्याचे दिसून येते, असे कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे.
ऐनवेळचे विषय मंजूर करायचे असतील तर सर्व सदस्यांचे विषय घेणे अपेक्षित होते. ऐनवेळचे विषय मंजूर करायचे नव्हते तर कुठलाच विषय मंजूर करायचा नव्हता. वाकड येथील स्थळ बदलचा विषय प्रशासनामार्फत आला होता. त्यामुळे या विषयाला विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते असे कलाटे यांनी म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group