पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोच्या मार्गिकेबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महामेट्रोतर्फे वल्लभनगर एस. टी स्थानकामागे सहयोग केंद्र सुरू करण्यात आले असून,या केंद्राला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नागरिक देखील मेट्रोसंबंधीच्या विविध विषयांची माहिती घेण्यासाठी सहयोग केंद्राला भेट देत असून, मागील दोन आठवड्यात मेट्रोच्या कामाची प्रगती, रोजगार निर्मिती, मुठा नदीपात्रातील काम, पर्यावरण बदल, वाहतूक व्यवस्था आदी विषयांची माहिती घेत आहेत.
नागरिकांच्या शंकांची उत्तरे देण्यासाठी महामेट्रोचे चार प्रतिनिधी या केंद्रात सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कार्यरत आहेत. या सहयोग केंद्रात मेट्रोची माहिती पुस्तिका उपलब्ध असून, मेट्रोचे मार्ग, स्थानके, मेट्रोमुळे नागरिकांना होणारे फायदे आदीची माहिती त्यात उपलब्ध आहे. याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी महामेट्रोतर्फे राबविण्यात येत असलेले हरित उपक्रम, अपघातात होणारी घट, प्रदूषणाचे कमी होणारे परिणाम, स्थानिकांना मिळणारा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार, प्रवासाचा कमी होणारा वेग अशा प्रकारची माहिती नागरिकांना दिली जात आहे.
याचबरोबर पुणे मेट्रो सामाजिक माध्यमांवर देखील सक्रीय असून, पुणे मेट्रो वेबसाईट, फेसबुक पेज, ट्विटर, यू-ट्यूब यावर प्रकल्पाची होणारी परगती आणि आवश्यक माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय १८००२७०५५०१ या टोल फ्री क्रमांकावर देखील संपर्क करून नागरिकांना मेट्रोबद्दलची माहिती घेता येणार आहे. याबरोबरच नागरिकांना आपल्या सूचना , माहिती आणि तक्रारी यादेखील या सहयोग केंद्रात मांडता येणार आहेत.





















Join Our Whatsapp Group