पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत चऱ्होली, रावेत आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाच्या “डीपीआर”ला (सविस्तर प्रकल्प अहवाल) केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने बुधवारी (दि.२९) मंजुरी दिली. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली वीट रचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चऱ्होली, रावेत आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडीमध्ये एकूण ३ हजार ६६४ घरे बांधण्यात येणार आहेत. या तीनही ठिकाणचे प्रकल्प एकूण ३७७ कोटी २८ लाखांच्या खर्चाचे आहेत. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागात दहा ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत घर देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत घर नसणाऱ्यांना घर दिले जाणार आहे. भाजपने पिंपरी चिंचवड महापालिका जिंकल्यानंतर सर्वात आधी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आणि कार्यवाही सुरू केली. या योजनेसाठी नागरिकांकडून अर्जही मागविण्यात आले. त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून किती जणांना घरे हवी आहेत, हे निश्चित केले जाणार आहे.
महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागातील १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागातील १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार चऱ्होली येथे १४४२ (खर्च १५० कोटी ३२ लाख), रावेतमध्ये ९३४ (खर्च ९१ कोटी ६ लाख), डुडुळगावमध्ये ८९६, दिघीत ८४०, मोशीतील बोऱ्हाडेवाडीमध्ये १२८८ ( खर्च १३५ कोटी ९० लाख), वडमुखवाडीत १४००, चिखलीमध्ये १४००, पिंपरीत ३००, पिंपरीतच आणखी २०० आणि आकुर्डीमध्ये ५०० घरे उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. महापालिकेने या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून आधी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने चऱ्होली, रावेत आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे एकूण ३ हजार ६६४ घरे बांधण्याच्या डीपीआरला १० नोव्हेंबर रोजी मंजुरी दिली. त्यानंतर हा डीपीआर केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने अवघ्या १९ दिवसांत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या तीन प्रकल्पांना अंतिम मंजुरी दिली आहे. त्याबाबत केंद्राच्या संबंधित तांत्रिक समितीने बुधवारी (दि. २९) महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे चऱ्होली, रावेत आणि बोऱ्हाडेवाडी येथे सर्वसामान्यांना परवडतील अशी एकूण ३ हजार ६६४ घरे उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तीनही ठिकाणच्या प्रकल्पांना एकूण ३७७ कोटी २८ लाखांचा खर्च केला जाणार आहे.