गुन्हे शाखा युनिट २ व चिंचवड पोलीसांकडून तीन आरोपींना अटक
पिंपरी (Pclive7.com):- उसने दिलेले पैसे परत मागणाऱ्या चिंचवडगावातील वृद्धाचे अपहरण करून त्यांचा खुन करुन मृतदेहाची ताम्हीणी घाटात विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्याचा छडा गुन्हे शाखा युनिट २ ची टीम आणि चिंचवड पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी लावला असून दोन आरोपींना जेरबंद केले आहे. नारायण बापुराव इंगळे (रा. चिंचवडगाव), राजेश नारायण पवार, समाधान ज्ञानोबा म्हस्के (दोघे रा. चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस स्टेशन येथे एका इसमास ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करुन जबरदस्तीने त्याच्याच ब्रेझा गाडी मधुन पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना त्यातील आरोपी नारायणला चिंचवड पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केला असता, नारायण याने पंजाब सिंध बँकेत मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या रणजित मेला सिंग (वय ७० वर्षे, रा. ओरा कौटी, प्लॅट नं. सी-१ प्लॅट नं. ९०४, उबाळे नगर, वाघोली, पुणे) यांच्याकडुन ३० लाख रुपये उसने घेतले होते. ते पसे परत दे म्हणुन रणजित सिंग यांनी नारायण इंगळे याच्याकडे सतत तगादा लावला होता. नारायणला ते पैसे परत करायचे नसल्याने त्याने त्याचे मित्र राजेश आणि समाधान यांना रणजित सिंग यांचा खुन करण्यासाठी ४ लाख रुपयांची सुपारी दिली होती. नारायण याने रणजित सिंग यांना (दि. १९/०४/२०२३) पैसे देतो म्हणुन बोलावुन घेतले. त्यानंतर तिघांनी मिळुन त्यांचे अपहरण करुन त्यांचा खुन केला. त्यांच्या मृतदेहाची व गाडीची विल्हेवाट राजेश आणि समाधान यांनी लावली होती.

त्यानंतर गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक गणेश माने, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, जयवंत राऊत, पोलीस नाईक देवा राऊत यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. गुन्ह्यातील आरोपी हे चिखली घरकुल परीसरात असल्याबाबतची माहिती त्यांना मिळाली. गुन्हे शाखा युनिट २ कडील स्टाफने वेशांतर करुन आरोपींचा घरकुल चिखली परीसरात शोध घेवुन सापळा रचुन शिताफीने आरोपींना घरकुल चौक, चिखली परीसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आम्हाला काही माहिती नाही, आम्ही नारायण इंगळे यांना ओळखत नाही. आम्हांला कशाला पकडले आम्ही काही केली नाही, अशी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांनानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपींनी सांगितले की, त्याचा मित्र नारायण याने त्यांना ४ लाख रुपयाची सुपारी दिली असुन त्या बदल्यात रणजित सिंग यास ठार मारुन त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची. नारायण इंगळे व राजेश पवार यांनी मागुन येवुन रणजित सिंग यांचा दोरीने गळा आवळुन व समाधान म्हस्के याने चाकुने चार ते पाच वेळा भोकसुन ठार मारले. त्यांनतर त्याचा मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळुन बेडशिटमध्ये बांधुन रणजित सिंग यांच्या लाल रंगाच्या ब्रेझा गाडीत टाकुन त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट ताम्हीणी घाटात धबधब्या जवळच्या नाल्यात टाकून व गाडी माणगाव एम.आय.डी.सी. परीसरात सोडल्याचे सांगितले. आरोपींनी मयत इसमाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावलेले ठीकाण व गाडी सोडल्याचे ठीकाण दाखवुन दिले. त्याप्रमाणे पोलीसांनी मयत इसमाचा मृतदेह व गाडी ताब्यात घेतली असुन पुढील तपास चालु आहे.

हि कारवाई गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, कृष्णदेव खराडे, पोलीस निरिक्षक प्रकाश जाधव, पोलीस निरिक्षक (गुन्हे), चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलिस उप-निरीक्षक गणेश माने, पोलीस उप-निरीक्षक शंभु रणवरे, गुन्हे शाखा युनिट ०२ कडील पोलीस अंमलदार जयवंत राऊत, प्रमोद वेताळ, देवा राऊत, जमिर तांबोळी, संतोष इंगळे, सागर अवसरे, विपुल जाधव, आतिष कुडके चिंचवड पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार पांडुरंग जगताप, धर्मनाथ तोडकर, पंकज बदाणे, उमेश वानखेडे यांच्या पथकाने केली.





















Join Our Whatsapp Group