पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट परिसर समजला जाणाऱ्या पिंपळे सौदागरमध्ये अज्ञातांनी ९ ते १० वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पिंपळे सौदागर मधील काटे पेट्रोल पंप ते गोविंद गार्डन चौक या रस्त्यावर पार्क केलेल्या नऊ ते दहा वाहनांची रात्री तोडफोड झाली आहे. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी मोठ मोठी दगडे फेकत गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत.

या घटनेमुळे पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून या अज्ञात व्यक्तींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. शहरात एकीकडे कडेकोट बंदोबस्त ठेवला गेला असताना वाहनांची झालेली तोडफोड यामुळे या गुंडांवर पोलिसांचा वचक राहिलाच नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.





















Join Our Whatsapp Group