पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील रक्षक चौकाजवळ भरदिवसा अन् रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या खून प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सागर शिंदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर योगेश जगताप आणि हृषिकेश खरात अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मृत सागर शिंदे आणि दोघे मारेकरी एकाच वाहनातून जात असताना त्यांच्यात भिशीच्या पैशांवरुन वाद झाले आणि त्याचे पडसाद हत्येत उमटले.

पिंपरी चिंचवडमध्ये काल (दि.२३) भरदिवसा सागर शिंदे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. फिल्मी स्टाईलने घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सायंकाळी पाच वाजता औंध-रावेत बीआरटी मार्गावरील रक्षक चौकाजवळ ही धक्कादायक घटना घडली. गोळीबार झाल्यानंतर त्याच वाहनाने काही गाड्यांना धडकही दिली. दिवसा घडलेल्या घटनेने मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक भयभीत झाले. गोळीबाराचा आवाज आल्याने नागरिकांना तिथून काढता पाय काढत होते. या घटनेचा गुन्हा सांगवी पोलिसात नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरु केला आणि काही तासातच योगेश जगताप आणि हृषिकेश खरात यांना अटक करण्यात आली. सागर शिंदे याच्या बंदुकीनेच त्याची हत्या करण्यात आल्याची कबुली या दोघांनी दिली असल्याची माहिती मिळत आहे.

सागर शिंदे हा २०१३ साली हत्येच्या गुन्ह्यात अटकेत होता. तर २०१८ साली तो तुरुंगातून बाहेर आला, त्यानंतर तो पेपर आणि दूध विक्रीचा व्यवसाय करायचा. तर योगेश आणि हृषिकेश हे सलून आणि रिक्षा चालवतात. प्रत्येक महिन्याला दीड लाखांच्या भिशीचं वाटप होतं, यावेळी नंबर कोणाला द्यायचा यावरुन त्यांची चर्चा सुरु होती. तिघेही चतु:शृंगी मंदिर परिसरातून काळेवाडीकडे निघाले होते. हृषिकेश गाडी चालवत होता, सागर पुढे डावीकडे तर योगेश मागे बसला होता. यावेळी भिशीच्या वाटपावरुन वाद विकोपाला गेला. चालत्या गाडीतच सागरने बंदूक बाहेर काढली अन् धमकवायला सुरुवात केली. त्यावेळी योगेशने बंदूक हिसकावली अन् पाठीमागून सागरवर गोळी झाडली. त्यानंतर सागर गाडीचे दार उघडून धावू लागला मग योगेशने दुसरी गोळी झाडली. यात सागरचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला तिथेच सोडून योगेश आणि हृषिकेश पसार झाले. त्यानंतर दोन तासांतच गुंडा विरोधी पथकाने या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.