पिंपरी (Pclive7.com):- आयुर्वेदामध्येसुध्दा दातांचे महत्व अधोरोखित केले आहे. जब तक जान है, दात की जरुरत है. दंत वैद्याचे हार्ट म्हणजे हाताची बोटे आहेत. ‘डोन्ट अंडर इस्टिमेट दि पॉवर ऑफ डेन्टिस्ट’ असे सांगत कोणीही दंत वैद्याला कमी लेखू नये. माणसाच्या जीवनात दंत वैद्याचे महत्व खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सेलिब्रेटी डेन्टिस्ट डॉ. संदेश मयेकर यांनी केले. चिंचवड येथे इंडियन डेन्टल असोशिएशनच्या ५६ व्या राज्य परिषदच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात या परिषदे अंतर्गत दंत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन सिने अभिनेता तुषार कपुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक, सचिव डॉ. अशोक ढोबळे, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील, सचिव डॉ. नितीन बर्वे, ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर माऊली फरांदे, वायसीएम रुग्णालायाचे दंतविभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद वाघमारे, सचिव डॉ. मनिषा गरुड, डॉ. प्रकाश प्रसाद, डॉ. अभिजीत फरांदे, डॉ. मनिष फरांदे, डॉ. श्रीकांत गर्जे, डॉ. संदीप भिरूड, डॉ. निखिल दिवाण, डॉ. जयू तुपे, डॉ. दिपाली पाटेकर, डॉ. दिनेश चव्हाण, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, संघटनेचे सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संदेश मयेकर यांनी लिहिलेल्या ‘एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी’ या पुस्तकाचे प्रकाशन तुषार कपूरच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. मयेकर म्हणाले की, डॉक्टरांकडे उपचारांसाठी येणारा रुग्ण हा देव आहे. त्याची फसवणूक करू नका. तुम्ही निवडलेल्या व्यवसायावर मनापासून प्रेम करा. त्यातूनच तुम्हाला खरा आनंद, समाधान, यश, पैसा, प्रसिध्दी मिळेल. डॉक्टरांकडे उपचार करून रुग्ण समाधानाने घरी जातो, तो हॅपी मनी आणि रुग्ण असामाधानी झाल्यास तो अन् हॅपी असतो. शुभ्र दंतपंक्ती चेह-याचे सौंदर्य वाढविते. ज्यांना चांगल्या पध्दतीने आपले आयुष्य व्यतीत करायचे आहे. त्यासाठी दातांचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. ज्याचे दात मजबूत, निरोगी त्याचे आयुष्य चांगले. अन्यथा आजच्या धकाधकीच्या जीवनात फास्ट फुडमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. शरिराची योग्य काळजी घेतानाच दातांची निगा राखणे गरजेचे असल्याचे डॉ. मयेकर यांनी सांगितले.
प्रसिध्द अभिनेता तुषार कपूर म्हणाला, सिनेकलावंतांच्या आयुष्यामध्ये दंतवैद्याचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. कारण आम्हा कलावंतांना शरिराची अधिक काळजी घ्यावी लागते. आपला चेहरा आणि स्मितहास्य चांगले असावे यासाठी दंतपंक्तींवर फार लक्ष द्यावे लागते. ते शक्य होते केवळ दंतवैद्यांमुळेच, दंतवैद्य डॉ. संदेश मयेकर यांनी वेळोवेळी मोलाचा सल्ला मला दिला. त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे, अशा शब्दांत हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते तुषार कपूर याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
इंडियन डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक यांनी पिंपरी चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या या भव्य राज्य परिषदेचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांचा भरघोस पाठिंबा पाहता दंत वैद्यक शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे संघटनेची चळवळ पुढे जोमाने नेतील असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. अशोक ढोबळे यांनी राज्यस्तरीय दंत परिषद आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. राजेश प्रसाद यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. व्ही. व्ही. एस. वर्गीस, डॉ. निष्ठा कौशिक यांनी तर आभार डॉ. अभिजीत फरांदे यांनी मानले.