दपिंपरी (Pclive7.com):- अपंग, विधवा, घटस्फोटीत महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध योजनांची प्रकरणे एकाच ठिकाणी तात्काळ मार्गी लावण्यासाठी ५ जानेवारी रोजी पिंपरी येथे ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या विविध सवलतींसाठी नागरिकांना होणारा त्रास व शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व कामे एकाच ठिकाणी तात्काळ होण्यासाठी या शिबिराचे आयोजन आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या डिलक्स चौक पिंपरी येथील कार्यालयात करण्यात आले आहे. तलाठी, तहसिलदार, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अधिकारी, रेशनिंग विभागाचे अधिकारी सर्व एकत्रितरित्या येऊन नागरिकांची प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यासाठी दिवसभर या शिबिरात सहभागी होणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील अंध, अपंग, मूकबधीर, कर्ण बधिर, मतिमंद, क्षयरोग, पक्षघात, विधवा महिला, कर्करोग, कुष्ठरोग, एड्स, घटस्फोटीत महिला, अत्याचारित महिला, परित्यंक्ता महिला, अनाथ मुले-मुली, यांना संजय गांधी निराधार योजनेमार्फत पेन्शन योजना व ६५ वर्षांवरील नागरिक ज्यांना मुलगा नाही अशा नागरीकांना श्रापण बाळ योजनेमार्फत व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष नितीन घोलप यांनी केले आहे.