पिंपरी (Pclive7.com):- आमदार महेश लांडगे आणि मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या सोहळ्यात प्रल्हाद वामराव पै ‘सुखी जीवनाचे गुपित’ उलघडणार आहेत. सुखी जीवनाचा मुलमंत्र देणार असून असा कार्यक्रम शहरात पहिल्यांदाच होत आहे. शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन, राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी केले आहे.
भोसरीतील, अंकुशरराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानात १२ ते १४ जानेवारी २०१८ दरम्यान ‘संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा होणार आहे. उद्या संध्याकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. शुक्रवार ते रविवार दररोज सायंकाळी साडेसात वाजता प्रल्हाद वामनराव पै प्रबोधन करणार आहेत. तसेच दररोज सायंकाळी पाच ते सहा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्नर माऊलींचा हरिपाठ व संगीत जीवनविद्या होणार आहे. शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी सहा ते साडेसहा या वेळेत सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या शिष्ये अशोक नाईक आणि साडेसहा ते सात या वेळेत अंकुश परहर यांची प्रवचने होणार आहेत.
खासदार अमर साबळे म्हणाले, वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरीत विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या आहे. सुखाला कारण विचार आणि दुःखाला कारण अविचार, अशा प्रकारचे वामनराव पै यांनी दिलेल्या विचारांचा जीवनविद्या मिशनचे साधारणतः १५ हजार अनुयायी प्रसार करीत आहेत.
प्रल्हाद वामनराव पै यांचे विचार ऐकल्यावर नागरिकांमध्ये बदल होईल. नागरिकांच्या मना-मनामध्ये सद्गुरुंचे विचार पोहचविणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड शहरात असा प्रबोधनाचा कार्यक्रम पहिल्यांदाच आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून होत आहे. सद्गुरु तीन दिवस ‘सुखी जीवनाचे गुपित’ उलघडणार आहेत. यामुळे नैराश्यात राहणा-या नागरिकांना चांगला मुलमंत्र मिळेल, असा मला विश्वास असे, खासदार साबळे म्हणाले. तीन दिवस होणा-या कार्यक्रमाचा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.