पिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असून मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू झाले आहे. शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वात गाव भेट दौरा आयोजित करून शहरातील विविध भागांतील नागरिकांशी संवाद साधत आहेत. परिसरातील समस्या, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न याबाबतचा आढावा शिवसेना नेत्यांनी घेतला असून या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शिवसेनेचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांचा गाव भेट दौरा झाला. या दौऱ्यात संजोग वाघेरे यांनी बोपखेलमधील सर्व नागरिकांशी संवाद साधला. बोपखेलमध्ये भेडसावणारे प्रश्न जाणून घेतले. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांना अपेक्षित असणाऱ्या विकासाबाबत चर्चा केली. शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पुलाच्या कामाबाबत संजोग वाघेरेंना विनंती..
बोपखेल येथील सैन्य दलाच्या हद्दीतील पुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या पुलाबाबत आश्वासने दिली आहेत. मात्र, अद्यापही या पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे संजोग वाघेरे यांच्याकडे बोपखेल येथील नागरिकांनी पुलाचे काम पूर्ण करून घेण्यासाठी विनंती केली. त्यावर, महापालिका आयुक्त तसेच शासनाकडे या बाबत पाठपुरावा सुरू असल्याचे वाघेरे यांनी सांगितले. दरम्यान, काही वर्षांपूर्वी बोपखेलच्या नागरिकांनी पुलासाठी आंदोलन केले होते. त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही नागरिकांनी केली.
























Join Our Whatsapp Group