तळेगाव (Pclive7.com):- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या चारचाकीने रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या दोन गाडींना पाठीमागून धडक देली. ही घटना शनिवार (दि.१) दुपारी पावणे तीनच्या सुमारास तळेगाव पोलिस स्टेशनपासून एक किलो मीटर अंतरावरील जिजामाता चौकात घडली. मुख्याधिकारी मद्य पिवून गाडी चालवित असल्याची फिर्याद नुकसान झालेल्या गाडी मालकाने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन. के. पाटील (रा. तळेगाव दाभाडे) हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी तळेगावातील काका हलवाई दुकानाजवळ पार्क केलेल्या दोन चारचाकी गाड्यांना पाटील यांच्या ताब्यातील गाडी क्रमांक (एमएच १३ ईसी ९६३३) वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. गाडी चालविताना पाटील हे मद्यधुंद अवस्थेत असल्याची फिर्याद नुकसान झालेल्या गाडीचे मालक सिध्दाराम इरप्पा लोणीकर (३७, रा. शिवसाई रेसीडेन्सी, नढेनगर, काळेवाडी) यांनी तळेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी पाटील यांच्यावर मद्य पिऊन निष्काळीपणे वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणी पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पुण्यातील कल्याणीनगर येथील कार अपघातप्रकरण नुकतेच घडले असल्याने, पोलिसांची मोठ्या प्रमाणात गस्त वाढली आहे. पोलिसांकडून पब आणि बारची कसून झाडाझडती घेतली जात आहे. यातच तळेगावच्या अपघाताची घटना घडली आहे. मात्र या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.