पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात आज मनसेच्यावतीने पाणी दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. आज होणार्या महासभेत पाणी दरवाढ करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळेच ही दरवाढ करू नये या मागणीसाठी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही या आंदोलनात आपला सहभाग दर्शविला.
यावेळी बोलताना सचिन चिखले म्हणाले की, शहरवासियांचे पाणी चौपट महाग करण्याचा घाट घातला जात आहे. या दरवाढीला मनसेचा पूर्णपणे विरोध आहे. महासभेत सत्तेच्या जोरावर भाजपने दरवाढ केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, जेष्ठ नेत्या सुलभा उबाळे, भगवान वाल्हेकर, नगरसेवक अमित गावडे, सतीश भोसले, मिनल यादव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, शाम लांडे, प्रशांत शितोळे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.