भोसरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेतून तीव्र इच्छुक असलेले माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर आले नसली तरी महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांची ही दुसरी टर्म आहे. पुन्हा विजयी होऊन हॅट्रिक करण्यासाठी त्यांनी दंड थोपटले आहेत. मात्र त्यांना यावेळी लढत सोपी नाही आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ही संधी साधण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटपचा फॉर्म्युला ठरला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात नुकताच अजित गव्हाणे यांनी समर्थकांसह प्रवेश केला आहे. त्यांच्या निकटवर्तींकडून भोसरीची जागा तुतारीलाच सुटणार असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुलभा उबाळे यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यातच आता रवी लांडगे यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यामुळे महा विकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

महायुतीकडून भोसरी मध्ये महेश लांडगे यांची उमेदवारी निश्चित असून आता महाविकास आघाडीत नेमकी जागा कोणाच्या वाट्याला जाणार? आणि कोण उमेदवार असणार यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.





















Join Our Whatsapp Group