पुणे (Pclive7.com):- कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासाेबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तरुणीच्या मित्राने तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबतची प्राथमिक माहिती कोंढवा पोलिसांना दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.
पीडित तरुणी मूळची परराज्यातील आहे. तिचा मित्र जळगावमधील आहे. दोघे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तरुणी अणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले हाेते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिघे जण पसार झाले. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीला मित्राने रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालय प्रशासनाने याबाबतची माहिती मध्यरात्री कोंढवा पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तातडीने तपास करण्याचे आदेश देण्यात आले. शुक्रवारी सकाळी याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कार प्रकरणातील पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची दहा पथके रवाना झाली आहेत.