चिंचवड (Pclive7.com):- अजितदादांनी शब्द फिरवला.. असं म्हणत चिंचवडच्या समर्थकांनीचं थेट अजित पवारांना घरचा आहेर दिला आहे. चिंचवड विधानसभेत महायुतीने भाजपच्या शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीने काही तासांतच बैठक बोलावत थेट अजित पवारांबाबत नाराजीचा सूर आळवला. आणि दिवाळीपूर्वी महायुतीत बंडाचे फटाके फोडण्याचा ठराव केला आहे.
काहीही झालं तरी आम्हाला भाजपचा प्रचार करायचा नाही, त्यामुळं महाविकास आघाडी आमच्यातील ज्याला उमेदवारी देईल, आम्ही त्यांचाच प्रचार करु. अशी बंडाची भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. या बैठकीत नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे या इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, दिलीप काळे, चंद्रकांत तापकीर, तानाजी जवळकर, श्याम जगताप, शिरीष काळे, प्रशांत सपकाळ, बापू कातळे या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत पुढची भूमिका जाहीर करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील या नेत्यांनी ठराव केल्याप्रमाणे खरंच बंड करणार की त्याचा फटका महायुतीला बसू नये म्हणून अजित पवार या नेत्यांचे बंड थंड करणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.






















Join Our Whatsapp Group