पिंपरी (Pclive7.com):- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत असताना मोहननगर येथे एकाला पोलिसांनी गावठी पिस्तुलासह जेरबंद केले आहे. सचिन दिवान राजोरिया ऊर्फ वाल्मिकी (वय ३४ वर्षे, रा. समता नगर, लोहगांव, पुणे, मुळ रा. बैरेक नं.११३२, इमली पाडा, फारवर लाईन, उल्हास नगर नं. ३, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी ठाणे शहर पोलिसांच्या हद्दीत एका खुनाच्या गुन्ह्यात चार वर्षापासून तो फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पुणे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
संदिप डोईफोडे (पोलीस उप आयुक्त गुन्हे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांची माहीती घेत असताना (दि.३१) रोजी गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस अंमलदार सोमनाथ बो-हाडे व स्वप्निल महाले यांना माहिती मिळाली कि, एकजण अवैधरित्या पिस्तूल घेवुन मोहननगर, चिंचवड, या परिसरात येणार आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दोन पथक तयार करुन मोहननगर, चिंचवड येथे जावुन सापळा लावला. संबंधित व्यक्ती हा संघवी केसरी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या थांबलेला दिसला असता पथकाने शिफारतीने त्याला पकडले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण ४१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या आरोपीच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती घेतली असता या आरोपी विरुध्द विठ्ठलवाडी पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे गंभीर खुनाचा गुन्हा नोंद असून या गुन्ह्यात तो चार वर्षा पासुन फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस अमंलदार सोमनाथ बोऱ्हाडे, मनोजकुमार कमले, गणेश महाडीक, सचिन मोरे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group