सांगवी (Pclive7.com):- पोलीस असल्याची बतावणी करून तोतयाने वृद्ध महिलेची एक कोटी १४ लाखांची फसवणूक केली. तुमच्या नावावर १७ गुन्हे दाखल असल्याचे सांगत महिलेला घाबरवून ही फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २१ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत सांगवी परिसरात ऑनलाईन माध्यमातून घडला.
याप्रकरणी सांगवी येथील ६७ वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंधन बँक खाते, एचडीएफसी बँक खाते, आयसीआयसीआय बँक खाते, आयसीआयसीआय बँक खातेधारक आणि मोबाइल वरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल नंबरद्वारे, व्हॉट्सअप कॉल व व्हिडीओ कॉलवरुन बोलणाऱ्या लोकांनी पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशात वेगवेगळ्या नावाने पोलीस अधिकारी व मुंबई पोलीस असल्याची बतावणी करुन फिर्यादी यांना त्यांच्या नावाने असलेल्या मोबाइल नंबर विरोधात गंभीर स्वरुपाच्या १७ तक्रारी असल्याची भिती घातली. तसेच नरेश गोयल मनी लॉड्रींग केसमधील दोन करोड रुपयाचे दर महिना १० टक्के कमिशन (२० लाख रुपये) मिळाले असल्याचे सांगितले. त्यामध्ये फिर्यादी महिलेला अटक होण्याची भिती घालून वेगवेगळ्या बँक अकाऊंटवर जबरदस्तीने एकूण एक कोटी १४ लाख २० हजार १८८ रुपये भरण्यास भाग पाडत फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.