पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास, राज्यातील महायुती सरकारने केलेली विकास कामे आणि राबवलेले अनेक लोकाभिमुख उपक्रम यामुळेच विधानसभा निवडणुकीत जनतेने भरभरून कौल दिला. भोसरीत आमदार महेश लांडगे तिसऱ्यांदा आमदार झाले. तर चिंचवड मधून शंकर जगताप हे देखील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. शहरात भाजपची ताकद पूर्वीपेक्षा वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपची पुन्हा निर्विवाद सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असा विश्वास माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांच्या विजयानिमित्त त्यांच्या सत्कार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे, माजी खासदार अमर साबळे, राजेश पिल्ले, सदाशिव खाडे, मोरेश्वर शेडगे, बापू काटे, कुणाल वाव्हळकर, नामदेव ढाके, विलास मडिगेरी, अजय पाताडे, संजय मंगोडेकर, शितल शिंदे, शैला मोळक, राज तापकीर, राजू दुर्गे, विजय फुगे, कैलास कुटे, गणेश लंगोटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने विजयाची स्वप्ने पाहिली. कुठल्या नेत्याला कुठलं खातं द्यायचं. कोणाला मंत्री पद द्यायचं. कोणाला जेलमध्ये टाकायचं हे सर्व ठरवलं होतं. पण, जनता सुज्ञ असल्याने मतदारांनी आम्हाला कौल दिला. विरोधक अद्यापही हार मानायला तयार नाहीत. ते आता ईव्हीएमला दोष देत आहेत. ते नागरिकांना काही बोलू शकत नाहीत.
गेल्या ४५ वर्षात आम्ही अनेक निवडणूका पाहिल्या, लढलो. हार पत्करली. पण, आम्ही कधी संशय घेतला नाही. आता विजयी झालो तर विरोधक ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत आहेत. लोकसभेत आम्हाला अपयश आलं. हरियाणा, कर्नाटकमध्ये हरलो. तेव्हा आम्ही संशय व्यक्त केला नाही. विरोधकांना पराभवाचे कारण शोधता येत नसल्याने ते ईव्हीएमला दोष देत आहेत, असं मत दानवे यांनी व्यक्त केलं आहे.