पिंपरी (Pclive7.com):- क्रिकेट खेळण्यास मनाई केल्याच्या कारणावरून कुटुंबियांना बॅटने मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि.२४) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास खेड तालुक्यातील भांबोली गावात घडली. याबाबत ३५ वर्षीय महिलेने बुधवारी (दि.२५) महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी एकनाथ वसंत मेंगळे, मनोहर शिवराम मेंगळे, अनिल बबन मेंगळे आणि बबन आप्पा मेंगळे (सर्व रा. मु. पो. भांबोली, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी महिलेच्या घराजवळ क्रिकेट खेळत होते. त्यावेळी फिर्यादी महिला या सामाईक जमिनीमध्ये जनावरांचे शेण गोळा करत होत्या. दरम्यान, एक चेंडु फिर्यादी यांच्या दिशेने जोरात आला. फिर्यादी यांचे सासरे शांताराम मंगळे यांनी खेळणाऱ्या मुलांना चेंडू इकडे आम्हाला लागेल. तुम्ही इकडे चेंडु मारु नका, असे सांगितले.
या कारणावरुन खेळणाऱ्यांपैकी फिर्यादी यांचे चुलत दीर यांनी संगनमत करुन, तुम्ही आम्हाला खेळू देत नाही. तुमच्या गवऱ्याच पेटवून देतो, असे म्हणत फिर्यादी व सासरे शांताराम मंगळे यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी यांचे सासरे शांताराम मेंगळे, नवरा संजय मंगळे, सासु बारकावाई मेंगळे यांना मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या पाठीला व डाव्या हाताला फॅक्चर झाले. तसेच, सासरे, सासु व नवरा यांना देखील मार लागल्याचे फिर्यादीत नमूद आहे.