पुणे (Pclive7.com):- कॉँग्रेसच्या संविधान विरोधी काळाचा अस्त झाला असून भारतीय जनता पक्षाचे संविधान गौरव काल सुरू झाला आहे. भारताचे हे सर्वश्रेष्ठ संविधान युगानुयुगे जनतेला प्रेरणा आणि संरक्षण देत राहील. येत्या काळात भारत विश्वगुरु होण्यासोबतच जगातील तिसरी महासत्ता बनणार आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीर नेतृत्व करत आहेत. भारताचे संविधान गौरव अभियान जनतेला प्रेरक ठरेल, संविधान गौरव अभियानाने जनतेचा आत्मविश्वास वाढणार असा आत्मविश्वास केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी येथे व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘संविधान गौरव अभियान’ च्या पुण्यातील सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘ज्यांनी संविधानाची निर्मिती केली त्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी काम त्यावेळी कॉँग्रेस पक्षाने केले. संविधानामध्ये अनेकवेळा घटना दुरुस्त्या करून केवळ राजकीय स्वार्थ साधण्याचे काम कॉँग्रेसी नेत्यानी केले. कॉँग्रेस सरकार नसलेल्या राज्यात आणीबाणी लागू करून ती सरकारे बरखास्त करण्याचे काम केले. याउलट भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मागील दहा वर्षात बाबासाहेब यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले. संसदेत तैलचित्र लावण्याचे काम भाजपाने केले. त्यांच्या निवासस्थानांचे रूपांतर स्मारकात करण्यासाठी पाच ठिकाणी स्मारके उभे केली. यामुळे संविधान निर्माते आणि संविधानाचा विशेष गौरव झाला आहे.
अभियानाचे प्रदेश संयोजक आणि विधान परिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांनी प्रास्ताविक करून महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या अभियानाची माहिती दिली. दिलीप कांबळे अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र राज्य यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष दिलीप कांबळे, पुणे कॅन्टोन्मेंटचे आ. सुनील कांबळे, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आ. हेमंत रासने, पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे, महामंत्री राजेश पांडे, धनराज बिरडा, अनुसूचित जाती मोर्चाचे भीमराव साठे, सचिन आरडे, स्थानिक नगरसेवक अर्चना पाटील, अजय खेडेकर, विजयमाला हरिहार, आरती कोंढरे, मनीशा लडकत, मंजूषा नागपुरे, हरीदास चरवड, पल्लवी जावळे, सम्राट थोरात व पक्षाचे शहर पदाधिकारी महेश पुंडे, राहुल भंडारे, प्रमोद कोंढरे आणि असंख्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. धीराज घाटे यांनी आभार व्यक्त केले.
आमदार अमित गोरखे यांनी संविधान गौरव अभियानाची माहिती देताना महाराष्ट्रातील या कालावधीतील नियोजित प्रमुख सभा पुढीलप्रमाणे होणार असल्याचे सांगितले.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा (ठाणे), ज्योतिरदित्य सिंधीया (पुणे), भूपेंद्र यादव (मुंबई), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर), नितीन गडकरी (छत्रपती संभाजीनगर) तसेच ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर, पनवेल, नवी मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आदि जिल्ह्यांत यशस्वी नियोजन झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच, ‘विविध महाविद्यालये, वसतीगृहे आदि ठिकाणी ‘आमचे संविधान – आमचा अभिमान’ या विशेष कार्यक्रमातून विविध स्पर्धा, निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून जनजागृती करण्यात येणार आहे. युवा मोर्चा यासाठी पुढाकार घेणार आहे. ‘नमो अॅप’ च्या माध्यमातून ऑनलाइन प्रश्नावली स्पर्धा आयोजन करण्यात येणार आहे. संविधानप्रती लोकांची जागरूकता वाढविणे, संविधान लोकाना उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. समाजातील युवक वर्ग, बुद्धिजीवी वर्ग, महिला, अनुसूचित जाती यांना विशेषत्वाने सामील करून घेण्यात येणार आहे. सामाजिक विषयांवर काम करणाऱ्या नामवंत वक्ते, कार्यकर्ते यांचे परिसंवादांचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध भागांत संविधान जागृती यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रसार माध्यमांवर विविध नेते आणि वरिष्ठ पदाधिकारी याबाबत जनजागृती करणार आहेत’ असे त्यांनी सांगितले.