
हिंजवडीमध्ये (दि.१९) सकाळी मोठी दुर्घटना घडली होती. कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता. तर ६ जण गंभीर जखमी झाले होते. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. ट्रॅव्हल्स मध्ये एकूण १२ कामगार होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी (दि.२०) धक्कादायक माहिती समोर आली होती. हिंजवडीमधील ती घटना अपघात नसल्याचे समोर आले होते. ही आग अपघाताने नव्हे, तर चालकाकडून हेतुपरस्सर आग लावण्यात आली होती. या घटनेत स्वत: चालकाने ज्वलनशील केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला होता. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला होता. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता, अशी माहिती समोर आली होती.
चालकाचा दिवाळीत पगार कापला होता. तसेच गाडीतील सह कर्मचारी यांनी त्याला त्रास दिला होता. त्यामुळेच चालकानं, सूडबुद्धीने हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासातून उघडकीस आली होती. जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे. तिघांशी वाद होता त्यांना मारायचं म्हणून त्याने हा प्रकार केला. पण या घटनेत चौघांचा निष्पाप बळी गेला. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत शंकर शिंदे, गुरुदास लोखरे, सुभाष भोसले आणि राजन चव्हाण यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेत आरोपी चालक जनार्दन हंबर्डीकर याचा पाय देखील भाजला गेला होता. तेव्हापासून तो मेडिकल कस्टडीमध्ये होता. आज डिस्चार्ज मिळताच हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अखेर अटक केली असून पुणे जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे.






















Join Our Whatsapp Group