पिंपरी (Pclive7.com):- बोपखेल गाव येथे पोलिस चौकी सुरु करण्यात यावी अशी मागणी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे करण्यात आली आहे. युती सेनेच्या पदाधिकारी प्रतिक्षा घुले यांनी या संदर्भात खासदार बारणे यांना निवेदन दिले आहे.

प्रतीक्षा घुले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोपखेल गाव हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरात येत असून, दापोडी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या या गावची लोकसंख्या २५ हजारच्या आस-पास आहे. या परिसरात बोपखेल गावठाण, रामनगर झोपडपट्टी व गणेशनगर असा मोठा रहिवासी भाग आहे.

परंतु बोपखेल या भागात पोलिस चौकी नसल्याने कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिला नाही. छोटे-मोठे गुंड व्यापाऱ्यांना त्रास देऊन पैशांची मागणी करतात. तसेच अनेक अवैध धंदे येथे सर्रास चालु आहेत. दादागिरी-भाईगिरी करणारे गुंड यांना धाक राहिलेला नाही. येथे पोलिस चौकी नसल्याने व पोलिस स्टेशन लांब असल्या कारणांमुळे सामान्य नागरिक भीतीच्या वातावरणात आहे. येथील अनेक घटनांमुळे येथील वातावरण बिघडले असून अल्पवयीन व युवा पिढी त्या गुंडांचा आदर्श घेत आहेत. त्यामुळे बाल-गुन्हेगार, वेगवेगळ्या प्रकारची व्यसने करणारे तरुण यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

परिणामी येणारी पिढी चुकीच्या गोष्टींचा आहारी जात आहे. तसेच अशा समाजविघातक प्रवृत्ती वाढत चालल्या आहेत. बोपखेल- खडकी उड्डाणपूल झाल्यामुळे रहिवाशी भाग वाढत चालला आहे. परिणामी लोकसंख्या हि वाढत चालली आहे. म्हणुन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस चौकी असणे गरजेचे आहे. याबाबत पोलिस प्रशासना सोबत वारंवार पत्रव्यवहार करुन देखील अद्यापही बोपखेल येथे पोलिस चौकी झालेली नाही, तरी बोपखेल येथे पोलीस चौकी मंजुर करण्यात यावी अशी मागणी प्रतीक्षा घुले यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे केली आहे.





















Join Our Whatsapp Group