मोशी (Pclive7.com):- मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने धूमाकुळ घातला. अनेकांचे संसार, हातातोंडाला आलेली शेतातील पिके, गुरे-ढोरे पूरामध्ये वाहून गेले. बळीराजाला या संकटातून बाहेर करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातून राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनीही पुढाकार घेतला. सोलापूर जिल्ह्यातील दोन गावांना प्रत्यक्षात जाऊन अन्नधान्यासह, साड्या, ऊबदार कपडे, टॉवेल, बिस्कीटांचे वाटप केले. आम्ही तुमच्या सोबत आहोत असा शाब्दिक आधाराही बळीराजाला दिला.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात मुंढेवाडी आणि अर्जुनसोंड या ठिकाणी सकाळी एक टेम्पोभरून सर्व साहित्य रवाना करण्यात आले. दोन्ही गावांमध्ये शेतकऱ्यांना या साहित्याचे वाटप केले. यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे यांच्यासह इतर महिला पदाधिकारी तसेच महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. पूरग्रस्त नागरिकांना मदत नव्हे तर कर्तव्य आहे, असे म्हणत सामाजिक बांधिलकी जपत प्रा. कविता आल्हाट यांच्यासह कुटूंबियांनी प्रत्यक्षात भेट देऊन साहित्य वाटप केले.

बळीराजा संकटात अडकलेला आहे. संकटाच्या काळात एकमेंकाना मदतीचा हात देणं, साथ देणं ही आपली संस्कृती आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उध्दवस्त झाले आहेत. शेती खरडून गेली आहे. गुरे-ढोरे वाहून गेली त्यांच्या दुखामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. असा प्रयत्न सर्वांनी करून बळीराजाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू.
– प्रा. कविता आल्हाट
(राष्ट्रवादी शहराध्यक्षा पिंपरी-चिंचवड)