पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीनंतर आता राज्य निवडणूक आयोगाने दोन प्रभागातील चार जागांवरील आरक्षणात बदल केला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षणात बदल झाला आहे. प्रभाग क्र.३० मधील ओबीसी जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे प्रभाग क्र.१९ मधील आबीसी जागेवरील महिला आरक्षण रद्द झाले. सर्वसाधारण जागेवरील प्रभाग क्र.३० मधील महिला आरक्षण रद्द झाले असून प्रभाग क्र.१९ मधील एक सर्वसाधारण जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. या सोडतीनंतर प्रभागातील आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले.अऩुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षणांमुळे अनेक प्रभागात काही माजी नगरसेवक व इच्छुकांचा पत्ता कट झाला. तर, काही ठिकाणी उमेदवार बदलण्याची वेळ आली.

मात्र, या आरक्षण सोडतीनंतर निवडणूक आयोगाने दुरुस्ती सूचवत दोन प्रभागातील आरक्षणात बदल केला. त्याचा चार जागांवर परिणाम झाला आहे. आयोगा केलेल्या दुरुस्तीनंतर प्रभाग क्र.३० मध्ये सोडतीत ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित झालेली क जागा आता महिलांसाठी राखीव झाली आहे. तर, याच प्रभागातील जागा ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती. ती जागा सर्वसाधारण झाली आहे. तर, ओबीसी जागेवर एक जागा महिला आरक्षित झाली. त्यामुळे सोडतीत चिठ्ठी काढून सर्वात शेवटी प्रभाग क्र. १९ मधील ब जागा आबीसी महिलांसाठी राखीव झाली होती. त्या जागेवरील महिला आरक्षण रद्द झाले. तर. प्रभाग ३० मधील ड जागेवरील सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द करून प्रभाग क्र.१९ मधील क जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे.

दरम्यान, दोन प्रभागातील चार जागांवर झालेला हा बदल अनेक इच्छुकांसाठी परिणामकारक ठरणार आहे. परंतु, ही दुरुस्ती आणि आरक्षणातील बदल आरक्षण सोडतीतील नियमानुसार करण्यात आलेला आहे, असा दावा निवडणूक विभागाने केला आहे. तसेच, निश्चित केलेल्या आरक्षणाबाबत कोणतीही हरकत असल्यास ती नागरिकांना निवडणूक आयोगाकडे नोंदविता येणार असल्याचेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
सोडत काढताना कुठे झाली चूक ?
ज्या प्रभागांमध्ये एक किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्हीकरीता राखीव असतील, परंतु,त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांकरीता राखीव नसतील, तर अशा प्रभागांतील ओबीसी प्रवर्गाची जागा महिलांसाठी राखून ठेवण्यात येईल, अशी नियमातील तरतूद आहे. ही तरतूद प्रभाग क्र.३० मध्ये वापरली न गेल्याने झालेली चूक आयागाने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले.
आरक्षण सोडतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने सोडतीत झालेली चूक दुरुस्त केली आहे. नियमानुसार योग्य पध्दतीने निश्चित झालेले आरक्षण प्रसिध्द करण्यात आले आहे.याबाबत नागरिकांना १७ ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत निवडणूक विभागाकडे हरकत नोंदविता येणार आहे. असं पिंपरी चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पवार यांनी सांगितलं.
बदलानंतर दोन प्रभागातील आरक्षणाचे चित्र…
प्रभाग क्रमांक -१९ उद्योगनगर, विजयनगर, भाटनगर, पिंपरी कॅम्प
अ – अनुसूचित जाती – महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
क – सर्वसाधारण (महिला)
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – ३० दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी
अ – अनुसूचित जाती
ब -अनुसूचित जमाती – महिला
क – नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला
ड – सर्वसाधारण

























Join Our Whatsapp Group