
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत समाजवादी पक्ष ३२ जागा लढवणार आहे. ही घोषणा सपाचे शहराध्यक्ष बी.डी. यादव यांनी केली. यावेळी प्रदेश सचिव एम.जे. वाळके उपस्थित होते.

पुढे बोलताना समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष बी.डी. यादव म्हणाले की, आमचा पक्ष विविध आरक्षणांतर्गत आठ प्रभागामध्ये ३२ उमेदवार उभे करणार आहे. ज्यामध्ये सामान्य गट, अनुसूचित जाती, ओबीसी, अनुसूचित जमाती आणि महिलांना प्राधान्य दिले जाईल. आमच्या पक्षाच्या वतीने अनेक उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु आमचा पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. आमचे राष्ट्रीय नेते माननीय अखिलेश यादव साहेब आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांच्या आदेशानुसार, आम्ही लवकरच उमेदवाराच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर करणार आहोत.

समविचारी पक्षांसोबत युती करण्यासाठी चर्चा सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत अंतिम चर्चा झाल्यानंतर, युती संदर्भात निवडणूक रणनीती निश्चित केली जाईल. आमच्या राष्ट्रीय नेत्याने पक्षात सर्व घटकांना सामावून घेतले आहे. आणि सर्व जाती आणि धर्मातील इच्छुक उमेदवारांना प्रतिनिधित्व दिले आहे. त्याचप्रमाणे, आम्ही शहरातील सर्व श्रेणीतील इच्छुक उमेदवारांना संधी देखील प्रदान करून देणार आहोत. समाजवादी पक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी परिश्रमपूर्वक कार्य करेल.

अलिकडच्या काळात कुदळवाडीतील छोटे व्यवसाय महानगरपालिका प्रशासनाने उद्ध्वस्त केले आहेत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील रस्ते अडवले गेले आहेत. शहरात वाहतुकीची समस्या वाढली आहे. समाजवादी पक्ष वीज, पाणी, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि आरोग्य समस्या सोडवण्यासाठी काम करेल. शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. पक्ष या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्तांना निवेदन सादर करणार आहोत.





















Join Our Whatsapp Group