
पहिल्याच दिवशी अवघा परिसर झाला कृष्णमय..!
पिंपरी (Pclive7.com):- भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी भव्य-दिव्य आयोजन केलेल्या तीन दिवसीय श्रीकृष्णलीला मायरा कथेला धडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांचा तुफान प्रतिसादात विश्व विख्यात आध्यात्मिक प्रवक्त्या तथा कथाकार जया किशोरी यांच्या सुमधुर अमृतवाणीतून कथेचे पहिले पुष्प गुंफताना अवघा वाकड परिसर अक्षरशः कृष्णमय झाला होता.

दरम्यान, सोमवार (दि.२४) रोजी सायंकाळी मुंबई बंगलोर महामार्गानजीक वाकड येथील मोकळ्या मैदानात तीन दिवसीय श्री कृष्णलीला मायरा कथा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा अद्वितीय भक्तिरसाचा सोहळा साकार होत आहे.

कथेच्या शुभारंभ प्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी खासदार अमर साबळे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, रणजित कलाटे तसेच राम वाकडकर मित्र परिवारासह शहराच्या विविध भागातील भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते. भक्तांच्या अभूतपूर्व गर्दीने संपूर्ण मैदान खचाखच भरून गेले होते.

जया किशोरी दीदींच्या कथेने यापूर्वी लाखो भक्तांच्या हृदयात कृष्णप्रेमाचा झरा वहात आहे. मुख्य आयोजक राम वाकडकर यांच्यामुळे प्रामुख्याने वाकड, ताथवडे व पुनावळेतील भक्तांसाठी तीन दिवासीय कथा सोहळा प्रत्यक्ष अनुभवयाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कथेच्या पहिल्या दिवशी हजारो लोकांनी उपस्थित राहून, आनंद घेतला. यावेळी, अनेक भावीक भक्त कृष्ण भक्ती रसात तल्लीन झाले होते. माता-भिगिनींणी देवाच्या भक्तीत एकरूप होतं अक्षरश: ठेका धरला होता. सार्वजनिक आरतीने कथेच्या पहिल्या दिवसाचा समारोप करण्यात आला.
























Join Our Whatsapp Group