तळवडे येथील माजी नगरसेवक प्रवीण भालेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसला ‘सोडचिठ्ठी’; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
पिंपरी (Pclive7.com):- आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. प्रभाग क्र.१२ चे माजी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीतील स्थानिक नगरसेवकाच्या मक्तेदारीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

माजी नगरसेवक प्रवीण भालेकर हे आता भोसरीचे आमदार तथा भाजपचे प्रभावी नेते महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भालेकर यांनी राष्ट्रवादी सोडल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
“स्थानिक पातळीवरील राजकारणात पक्षातीलच एका नगरसेवकाची वाढती मक्तेदारी आणि कार्यशैली यामुळे मी त्रस्त झालो होतो. नागरिकांच्या कामांना योग्य न्याय मिळत नव्हता. त्यामुळे विकासाला प्राधान्य देत आमदार महेश लांडगे यांच्यासोबत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असे भालेकर यांनी सांगितले.

पुढील दिशा ठरवण्यासाठी भेटीगाठी सुरू..
आमदार महेश लांडगे यांच्यासोबत भालेकर यांची चर्चा झाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करण्यास उत्सुक आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भालेकर हे आपल्या प्रभागातील आणि शहरातील नागरिकांसाठी नवीन राजकीय दिशेने काम करणार आहेत. या संदर्भात लवकरच औपचारिक घोषणा आणि प्रवेशाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने पक्ष सोडल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वीच पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.





















Join Our Whatsapp Group