पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात भाजपच्या सत्ताकाळात शहरात हफ्तेखोरी, भ्रष्टाचार, दहशत आणि माज आलेला असल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला. “मी पुराव्याशिवाय बोलणार नाही. बिनबुडाचे आरोप माझे नाहीत,” असे ठामपणे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाजपची ‘धुलाई’ केली. पिंपरीत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावण्यात आली आहे. अनेक रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून तिथे उघडपणे हफ्तेखोरी सुरू आहे. गेल्या नऊ वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात असा विकास झाला आहे. टेंडरमध्ये रिंग करून दादागिरीने पैसे लाटले गेले. स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या संपत्ती कशा वाढल्या, पैसा कुठून आला, याची चौकशी झालीच पाहिजे.
महापालिकेवर टीका करताना त्यांनी सांगितले की, सत्तेची मस्ती, माज आणि नशा भाजपला आली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीतही पैसे खाल्ले गेले. महापालिका अक्षरशः भ्रष्टाचाराने पोखरली गेली आणि कर्जबाजारी करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये खोदाई माफिया फोफावला असून जिओ, एअरटेल, व्होडाफोनसारख्या कंपन्या राजरोसपणे रस्ते खोदत आहेत. शहरात दिवसाढवळ्या लुटारूंची टोळी वावरत आहे, असा आरोपही अजित पवारांनी केला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप करत ते म्हणाले, बिनविरोध निवडीसाठी सिनेस्टाईल पाठलाग केला गेला. एका उमेदवाराला पकडून गाडीत बसवून अर्ज मागे घ्यायला लावण्यात आले. भाजपची ही राक्षसी भूक मला पाहवत नाही. दहशतीमुळे आमच्या काही उमेदवारांनी माघार घेतली, ही आमची कबुली आहे. आर्थिक गैरव्यवहारांवर बोट ठेवत अजित पवार म्हणाले, 2017 पूर्वी पिंपरी पालिकेच्या ठेवी 4,844 कोटी होत्या, त्या आता 2,000 कोटींवर आल्या आहेत. ठेवी वाढायला हव्या होत्या, उलट कर्जरोखे काढून कोट्यवधी कर्ज केले. एवढा पैसा खर्च झाला असेल तर काम दाखवा. भाजपच्या सत्ताकाळात रस्ते अरुंद केल्यामुळे वाहतूक कोंडी वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

शेवटी त्यांनी 1992 ते 2017 या काळात पिंपरी चिंचवडचा कायापालट केल्याचा उल्लेख करत शरद पवारांनी शहराच्या विकासाला कशी गती दिली, याचे कौतुक केले. 2017 मधील विठ्ठल मूर्ती घोटाळ्याचा संदर्भ देत, त्या काळातील महापौर आज भाजपमध्ये असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अजित पवारांच्या या आरोपांमुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, येत्या महापालिका निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.






















Join Our Whatsapp Group