पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर निगडी प्रभाग क्रमांक १३ मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पॅनलतर्फे निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी प्रचाराला चांगलाच वेग दिला आहे.

निगडी प्रभाग क्रमांक १३ येथून माजी नगरसेवक सचिन चिखले आणि माजी नगरसेविका अश्विनीताई सचिन चिखले हे दोघेही आपल्या ठोस, लोकाभिमुख व विकासकेंद्रित कामांच्या बळावर पुन्हा एकदा निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांच्या सन २०१२ ते २०२५ या कार्यकाळात प्रभागामध्ये राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर व वस्तुनिष्ठ आढावा घेणारा प्रचार अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आला.
‘गतिमान विकासाचा कार्यसंघर्ष’ या आशयपूर्ण मथळ्याखाली सादर करण्यात आलेल्या या अहवालाचे प्रकाशन मनसे जनसंपर्क कार्यालय, निगडी येथे पार पडले. यावेळी साईनाथ नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर जामदार, कार्याध्यक्ष जयसिंग मगर, सचिव गवळी काका, तसेच ज्ञानेश्वर नेवसे, साबळे नाना व जंगम काका तसेच मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले.

दरम्यान, या प्रसंगी माजी नगरसेवक शशिकिरण गवळी हेही उपस्थित होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पॅनलमधून प्रभाग क्रमांक १३, निगडी विभागातून गट ‘अ’ मधून शशिकिरण गवळी, गट ‘क’ मधून अश्विनी सचिन चिखले आणि गट ‘ड’ मधून सचिन चिखले हे उमेदवार निवडणुकीस उभे आहेत.
या अहवालात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सुविधा, शिक्षण, उद्याने तसेच नागरी जीवनमान उंचावणाऱ्या विविध मूलभूत विकासकामांचा सविस्तर व वस्तुनिष्ठ आढावा मांडण्यात आला आहे. लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा चिखले दांपत्यासह मनसे पॅनलचा कार्यप्रवास या अहवालातून ठळकपणे समोर येतो, अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.






















Join Our Whatsapp Group