पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर पदावर माळी समाजाच्याच सदस्याची निवड करावी अशी एकमुखी मागणी शहरातील माळी समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांनी केली. यावेळी माळी समाजाला महापौर पदासाठी डावलले गेले तर आगामी निवडणूकांमध्ये भाजपला होणा-या परिणामास सामोरे जावे लागेल, असा इशारा माळी समाजाकडून देण्यात आला आहे
पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नगरसेविका अश्विनी जाधव, स्विनल म्हेत्रे, नम्रता लोंढे, माजी नगरसेवक अजय सायकर, सुनिल लोखंडे, स्विकृत प्रभाग सदस्य सागर हिंगणे, अजित बुर्डे, माजी सरपंच मंगलताई आल्हाट, पिंपरी चिंचवड माळी महासंघाचे आनंदा कुदळे, काळूराम गायकवाड, ईश्वर कुदळे, हनुमंत माळी, अनिल साळुंखे, सुरेश गायकवाड, समता परिषदेचे मच्छिंद्र दरवडे, योगेश लोंढे, मारूती जांभुळकर, संजय ताम्हाणे, हणुमंत म्हेत्रे, महात्मा फुले जनसेवा मंडळाचे अजय जाधव, दशरथ डोके, रमेश गिरमे, विठ्ठल लडकत, अरविंद दरवडे, रामभाऊ दरवडे, राजाभाऊ भुजबळ, रामहरी सायकर, पांडूरंग दर्शिले, शिवाजी बोराटे, प्रदिप आहेर, हिरामण बुर्डे, माणिक बुर्डे, ज्ञानेश्वर रासकर, संतोष जाधव, चंद्रकांत बुर्डे, आत्माराम माटे, सुहास ताम्हाणे, अरविंद दरवडे, उत्तम ताजणे, विनायक जाधव आदींसह विविध गावातील माळी समाजाचे ज्येष्ठ प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरेश म्हेत्रे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महापालिकेतील महापौर पद ओबीसी समाजासाठी राखीव आहे. या पदावर अगोदरच मुळ ओबीसींना निवडले जावे, अशी मागणी होती. परंतू भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी कुणबी जातदाखल्यावर निवडून आलेल्या नितीन काळजे यांची निवड केली. त्यामुळे समाजामध्ये विरोधाचे व नाराजीचे वातावरण झाले होते. नितीन काळजे यांनी चार दिवसांपुर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता माळी समाजाचाच महापौर व्हावा यासाठी संपूर्ण शहरातील माळी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटना तयारीला लागले आहेत. ‘अभी नही तो कभी नही’ असा नारा देत भाजपाला इशारा देण्यात आला आहे. शहरातील माळी समाजाकडून माळी समाजाचाच महापौर व्हावा असा आग्रह करण्यात येत आहे. लोकसभा, विधानसभा व सार्वत्रिक निवडणूकीत शहरात दुस-या क्रमांकावर असणा-या माळी समाजाने भाजपाच्या बाजूने मतदान केले आहे. शहरामध्ये तीनही विधानसभा मतदार संघात एक लाख एैंशी हजाराहुन जास्त माळी समाजाची लोकसंख्या आहे. याठिकाणी भाजपाची सत्ता येणास माळी समाजाचे महत्वपुर्ण योगदान आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या स्थापनेपासून शहरात माळी समाजाच्या महापौर पदावर अनिता फरांदे, अपर्णा डोके आणि डॉ. वैशाली घोडेकर यांना काम करण्याची संधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. परंतू माळी समाजाच्या पुरुष प्रतिनिधीस आतापर्यंत महापौर पद मिळाले नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीष बापट, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे समाजाच्या वतीने निवेदन देऊन पिंपरी चिंचवड शहराचा पुढील महापौर माळी समाजाचाच असावा. अशी मागणी आम्ही करणार आहोत. पिंपरी चिंचवड शहराचा प्रथम माळी पुरुष महापौर व्हावा हीच सर्वांची इच्छा आहे. जर आता माळी समाजाला महापौर पदासाठी डावलले गेले तर आगामी निवडणूकांमध्ये भाजपला होणा-या परिणामास सामोरे जावे लागेल, असा इशारा माळी समाजाकडून देण्यात आला आहे.