पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी- चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यामुळे सदर पद सध्या रिक्त झाले आहे. यामुळे शहर अभियंता पदावर नगर नियोजनातील अनुभवी शासकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे मागणी ई मेल द्वारे केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, शहर अभियंता हे पद महापालिकेच्या विकासकामांमध्ये, नगररचना, पायाभूत सुविधा, रस्ते, जलनिस्सारण, बांधकाम परवाने तसेच दीर्घकालीन विकास आराखडा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांशी थेट संबंधित आहे. पिंपरी चिंचवड या महानगराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे शहर अभियंता पदावर नगरनियोजनातील सखोल अनुभव असलेला, शासकीय पातळीवरील सक्षम व अनुभवी अधिकारी नियुक्त होणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दैनंदिन प्रशासकीय गरजांबरोबरच राज्य शासनाच्या धोरणांशी सुसंगत नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय सेवेतून आलेला अधिकारी अधिक उपयुक्त ठरेल, असे मला वाटते.
शासन नियुक्तच अधिकारी का असावा..
शहर अभियंता हे महत्वाचे पद आहे. त्यांच्यावर रस्ते, पूल, पाणी आणि मलनिस्सारण प्रणाली, सार्वजनिक इमारती, स्ट्रीट लाईटिंग, आणि ड्रेनेज सिस्टीमची योजना आखणे, रचना करणे आणि त्यांची देखभाल करणे आदी पायाभूत सुविधांची रचना आणि व्यवस्थापन करण्याची महत्वाची जबाबदारी असते.

त्याचबरोबर नवीन विकास प्रकल्पांचे आणि सध्याच्या पायाभूत सुविधांच्या अपग्रेडेशनचे व्यवस्थापन करणे, कंत्राटदारांशी समन्वय साधणे आणि बजेटमध्ये काम पूर्ण करणे महत्वाचे असते. विविध विभागांना आणि संबंधित संस्थांना तांत्रिक अभियांत्रिकी सहाय्य पुरवणे, तसेच जटिल अभियांत्रिकी समस्यांवर उपाय शोधण्याचे कौशल्य असणे गरजेचे असते. त्याचबरोबर शहराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची तरतूद करणे, ज्यात झोनिंग आणि भूमी वापराचा अभ्यास करणे आवश्यक असते. हे सर्व करीत असताना कायदेशीर आणि नियमांचे पालन देणे आवश्यक असते. महापालिकेतील महापौर आणि इतर पदाधिकारी यान प्रकल्पांच्या प्रगतीबद्दल माहिती देणे आणि अहवाल सादर करणे गरजेचे असते. त्याचबरोबर अभियांत्रिकी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे पर्यवेक्षण आणि मूल्यांकनाची जबाबदारी शासकीय अधिकारी उत्तम करू शकतो.
त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि पारदर्शक विकासाच्या दृष्टीने शहर अभियंता या महत्त्वाच्या पदावर राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील किंवा तत्सम अनुभवी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी आगृही मागणी वाघेरे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group