पिंपरी (Pclive7.com):- ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंगमधून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका नागरिकाची तब्बल १ कोटी ९४ लाख ४४ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गोविंद विश्वनाथ मुळे (वय ४०, व्यवसाय – धंदा-व्यवसाय, रा. चिखली, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आदित्य ठाकूर, जो स्वतःला व्हँटेज ट्रेडिंग ग्रुपचा एरिया मॅनेजर असल्याचे सांगत होता, याने टेलिग्राम अकाउंटद्वारे संपर्क साधला.
आरोपीने फिर्यादीला Vantage Markets या संकेतस्थळाची लिंक पाठवून फॉरेक्स ट्रेडिंग केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे सांगितले. विश्वास बसवण्यासाठी विविध टेलिग्राम ग्रुप्समध्ये बनावट युपीआय पेमेंटचे स्क्रीनशॉट दाखवून फिर्यादीला ट्रेडिंग करण्यास प्रवृत्त करण्यात आले. सुरुवातीला काही नफा दाखवून नंतर फिर्यादीकडून वेगवेगळ्या टप्प्यांत मोठी रक्कम गुंतवून घेतली. त्यानंतर अचानक फिर्यादीचे ट्रेडिंग खाते ब्लॉक करण्यात आले. यामध्ये फिर्यादीची एकूण एक कोटी ९४ लाख ४४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

ही घटना ०७ सप्टेंबर २०२४ ते २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली असून, ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटक नसून त्याचा पूर्ण पत्ता अद्याप निष्पन्न झालेला नाही. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. पोलीस प्रशासनाने नागरिकांना ऑनलाइन ट्रेडिंग, टेलिग्राम ग्रुप्स व अनोळखी लिंकच्या माध्यमातून होणाऱ्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.






















Join Our Whatsapp Group