पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपचा महापौर खुर्चीवर विराजमान होत नाही, तोपर्यंतच शहर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने स्वतःच्या संस्थेला ठेका मिळावा, यासाठी एका महिला उपायुक्तांच्या केबिनमध्ये घुसून मोठ-मोठ्याने बोलून ‘मी सांगतो त्याप्रमाणे नियम, अटी बदला, तसे केले नाही तर तुम्हाला बघून घेईन’, अशी धमकी देत शिवीगाळ केली. या घटनेमुळे महापालिका प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराने घाबरलेल्या महिला उपायुक्ताने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. ही घटना शुक्रवारी (दि. ६) दुपारी दीडच्या सुमारास महापालिकेत घडली.

याप्रकरणी एका महिला उपायुक्तांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार शहर भाजपचे उपाध्यक्ष पोपट हजारे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचे ८४ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपची सलग दुसऱ्यांदा बहुमताने सत्ता आली आहे. शुक्रवारीच महापालिकेत महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापौर आणि उपमहापौर आपल्या खुर्चीवर विराजमान होताच भाजप पदाधिकाऱ्याचा मुजोरीचा प्रकार समोर आला आहे.

महापालिकेच्या एका विभागातील कंत्राट भाजपचे शहर उपाध्यक्ष पोपट हजारे यांच्या ‘सन राईज फाऊंडेशन’ संस्थेला मिळावे, यासाठी त्यांनी महिला उपायुक्तांच्या केबिनमध्ये घुसून नियम बदलण्यासाठी दडपशाहीचा प्रयत्न केला. यावर संबंधित उपायुक्तांनी कंत्राटाबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, हजारे यांनी त्यांचे न ऐकता मी सांगतो, त्याप्रमाणे तुम्ही नियम व अटी बदला, मला काही माहिती, तुम्ही तसे केले नाही तर बघून घेईन, अशी धमकी देत मोठ-मोठ्याने बोलून सर्व कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ केली. या प्रकाराने घाबरलेल्या महिला उपायुक्तानी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
दरम्यान, संबंधित उपाध्यक्षाने सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘मी कोणतीही धमकी दिली नाही. हे कामकाज माझ्या संस्थेला मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने पत्र दिले आहे. महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून छत्रपती संभाजीनगर येथील संस्थेला काम दिले. शहरात काम करणारी संस्था असून डावलले आहे,’ असा दावाही त्यांनी केला.





















Join Our Whatsapp Group