आळंदी (Pclive7.com):- जर्मनीतील “श्री विठ्ठलधाम, ख्रिसचेम” येथील विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यापैकी माऊलींची मूर्ती १० फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानहून जर्मनीकडे रवाना झाली आहे. या दोन्ही संतांचे कार्य जगभरात पोहोचण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते.

भागवत धर्माची परदेशी भक्तांना होणार ओळख
भागवत धर्माचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने, देहू आणि आळंदी संस्थानाने या मूर्ती जर्मनीतील मंदिराला भेट देण्याचे ठरवले होते. याकामी स्वामी समर्थ प्रतिष्ठान (औंध) चे श्रीकांत पाटील यांनी आळंदी-देहू संस्थान आणि जर्मनीतील मंदिर प्रशासन यांच्यात यशस्वी समन्वय साधला. जर्मनीतील या विठ्ठल मंदिराला दरवर्षी हजारो परदेशी नागरिक भेट देतात. तिथे या मूर्तीची स्थापना झाल्यामुळे परदेशी भक्तांना दोन्ही संतांच्या आध्यात्मिक कार्याची ओळख होईल.

दोन फुटांची मकराना व्हाईट मार्बलची सुबक मूर्ती
या विशेष उपक्रमासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची २ फूट उंचीची मूर्ती जयपूर (राजस्थान) येथील “जैन श्वेतांबर मूर्तीकला केंद्र” येथून मकराना व्हाईट मार्बलमध्ये तयार करून घेण्यात आली आहे. ही मूर्ती आता जर्मनीकडे प्रवासाला निघाली असून, १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जर्मनीमध्ये या दोन्ही संतांच्या मूर्तीचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ रा. देखणे यांनी दिली आहे.





















Join Our Whatsapp Group