पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस शाळेसाठी’ या जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच २६ व्या टप्प्यात शहरातील १४ शाळांमध्ये जाऊन सुमारे २३६५ विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा व वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन, अपघात प्रतिबंधक उपाययोजना, हेल्मेट व सीटबेल्ट वापराचे महत्त्व, अल्पवयीन वाहनचालना टाळणे, तसेच सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करून जबाबदार नागरिक घडविण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.

‘एक दिवस शाळेसाठी’ या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २६ टप्प्यांमध्ये ४३२ शाळांमध्ये जाऊन तब्बल १,०२,९११ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, शाळा प्रशासन व पालकांकडूनही उपक्रमाचे कौतुक होत आहे.
पोलिस आयुक्त विनायक चौबे, अपर पोलिस आयुक्त शशिकांत महावकर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आगामी काळातही शहरातील विविध शाळांमध्ये अशाच प्रकारे जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.






















Join Our Whatsapp Group