पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात कै. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप यांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक विनोद नढे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच महापौर रवी लांडगे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

विनोद नढे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत आणि सर्वांगीण विकासात कै. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. अभ्यासू लोकप्रतिनिधी, कुशल संघटक आणि शहराचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषद सदस्य तसेच सलग तीन वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी विविध पदांवर काम करत शहराच्या प्रगतीसाठी आयुष्य वेचले.

शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न, रिंग रोडसारखे महत्त्वाचे प्रकल्प तसेच मूलभूत सुविधांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हित जपण्याला त्यांनी प्राधान्य दिले, असेही त्यात म्हटले आहे.
महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले जातात. अशा पवित्र स्थळी शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या नेत्याचे तैलचित्र लावणे हे त्यांच्या कार्याचा गौरव ठरेल आणि भावी लोकप्रतिनिधींना प्रेरणादायी ठरेल, असे विनोद नढे यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तात्काळ करावी, अशी मागणी विनोद नढे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group