पिंपरी (Pclive7.com):- नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचा सुळसुळाट सुरु आहे. शहराच्या विविध भागात नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरु असून ती तात्काळ भुईसपाट करावीत, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पिंपळे गुरवच्या विविध भागांत कोणतीही परवानगी न घेता मजल्यावर मजले चढवणे, व्यावसायिक वापरासाठी इमारतींचे रूपांतर करणे, तसेच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गाळे उभारणे असे प्रकार सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांना राजकीय वरदहस्त मिळत असून मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकामे होणे शक्य नसल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
विशेषतः निवडणूक काळात अशा बांधकामांना अधिक वेग आल्याचेही निदर्शनास आणण्यात आले आहे. ड प्रभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक २९ मध्येही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. या सर्व प्रकरणांचा मनपा प्रशासनाने तातडीने सर्व्हे करून नियमबाह्य बांधकामांवर जमीनदोस्त कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकारी व दोषीवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी. सामान्य नागरिकांच्या बांधकामांना विरोध नाही. नवी सांगवी ह प्रभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक ३१ मध्ये लोकप्रतिनिधीकडूनच सहा मजली अनधिकृत बांधकाम उभारण्यात आल्याचा आरोप आहे.

‘तीन मजल्यापर्यत बाधकाम केले असल्यास वरच्या सदनिका आम्हाला द्या, अन्यथा कारवाई करू.’ असा दम काहीकडून दिला जात आहे. दरम्यान, कारवाई न झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देण्यात येईल तसेच प्रसंगी न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही राजेंद्र जगताप यांनी निवेदनात नमूद केले आहे.
आमचा सामान्य नागरिकांच्या बाधकामांना विरोध नाही; मात्र व्यावसायिक स्वरुपाची अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत. अनधिकृत व्यावसायिक बांधकामांना भाजपच्या बड्या नेत्यांचा वरदहस्त आहे, सामान्य नागरिकांना त्यांच्या जागा विकण्यास भाग पाडले जाते, तसेच भागीदारीच्या नावाखाली सदनिका उभारल्या आहे.– राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक



















Join Our Whatsapp Group