पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभा शनिवार, दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात होणार आहे.

या सभेत स्थायी समितीच्या सभापती पदासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २१(१) नुसार निवड करण्यात येणार आहे. संबंधित नियमांनुसार ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी पीठासीन अधिकारी श्रीमती पवनीत कौर अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका या असणार आहेत.

स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व आहे. अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, शीतल वर्णीकर, कृष्णा सुरकुले, अर्चना कारंडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन हे भाजपाचे ११ सदस्य आहेत. सभापती पदाचे संदीप कस्पटे आणि अभिषेक बारणे, बाबासाहेब त्रिभुवन हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आता पक्षश्रेष्ठी या तीन जणांपैकी कोणाला संधी देणार की धक्कातंत्र देत आणखी कोणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ टाकणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.




















Join Our Whatsapp Group