पिंपरी (Pclive7.com):- घरफोडी करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत गुन्हेगाराला नागरिकांच्या सतर्कतेमुळे भोसरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई (दि.२२) रोजी सकाळी भोसरी परिसरात करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सिंह सुरजसिंह उर्फ फंट्यासिंग बावरी (वय २७, रा. गुरू गोविंदसिंग नगर, जालना) याने त्याच्या साथीदारासह साईदर्शन सोसायटी, इंद्रायणीनगर येथील एका घराचे लॉक तोडून आत प्रवेश केला. घरातून सुमारे ५७,५०० रुपयांचा ऐवज चोरून ते दोघे पसार होत असताना काही नागरिकांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. भोसरी पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी सागर सिंह याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल, घरफोडीसाठी वापरलेली साधने तसेच चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याचा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपीवर यापूर्वीही जालना व नागपूर येथे अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांच्या तत्परतेमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस येऊन आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




















Join Our Whatsapp Group