पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला विनंती केली आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि राहुल जाधव यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्याशी याबाबत चर्चा करून विनंती केली आहे.
पिंपरी महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपकडून राहुल जाधव यांनी महापौर पदीसाठी तर सचिन चिंचवडे यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. तर राष्ट्रवादीकडून विनोद नढे यांनी महापौर तर विनया तापकीर यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. महापालिकेत भाजपाची निर्विवाद सत्ता आहे. भाजपाचे ७७ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ नगरसेवक आहेत. त्यामुळे निवडणुक झालास भाजपाचा विजय निश्चित आहे. मात्र ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत.
एकनाथ पवार म्हणाले की, महापालिकेत भाजपाचे बहुमत आहे. निवडणूकीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. परंतू राष्ट्रवादीची ताकद पाहता, आम्ही त्यांना निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली आहे. आमचे काठावरचे बहुमत नाही, तरी देखील निवडणुक घ्यायची असेल तर ते राष्ट्रवादीने ठरवावे.
दत्ता साने म्हणाले की, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि राहुल जाधव यांनी महापौर निवडणुक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. त्याबाबत आमचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. दरम्यान, शनिवारी होणारी ही निवडणुक बिनविरोध होणार की, निवडणूक होणार याबाबत पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group