पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात परराज्यातून कामासाठी येणाऱ्या नागरिक व कामगारांसाठी नोंदणीकृत ‘वर्क परमिट’ सक्तीचे करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे.

भाऊसाहेब भोईर यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्रासह नेपाळ, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर कामगार व व्यावसायिक स्थायिक होत आहेत. पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भाडेकरूंची नोंदणी करणे बंधनकारक असले तरी प्रत्यक्षात १०० टक्के नोंदणी होत नसल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे भोईर यांनी नमूद केले आहे.
महापालिका आणि पोलिस प्रशासनाने समन्वय साधून परराज्यातून काम, नोकरी किंवा व्यवसायासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी नाममात्र शुल्कात वर्क परमिट प्रणाली लागू करावी, अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील वास्तव्यात असलेल्या नागरिकांची अचूक माहिती उपलब्ध होईल. तसेच अनधिकृत कागदपत्रे काढण्याच्या प्रकारांवरही आळा बसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या आठवड्यात सांगवी परिसरात एका घरात बेकायदेशीररीत्या म्यानमारमधील नागरिक राहत असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर शहर सुरक्षेच्या दृष्टीने कठोर नियमावली तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या व्यवसायांना परराज्यातील कामगारांची आवश्यकता आहे, त्या व्यावसायिक मालकांनाही संबंधित कामगारांचे वर्क परमिट घेणे बंधनकारक करावे. तसेच वर्क परमिटसोबत चरित्र पडताळणीची प्रक्रिया राबविल्यास पोलिस प्रशासनाचे काम सुलभ होईल आणि शहरातील नागरिक व कामगारांची अचूक संख्या स्पष्ट होईल, असेही भोईर यांनी म्हटले आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कडक उपाययोजना करून नियमावली जाहीर करावी, अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.
Tags: Bhausaheb Bhoir


















Join Our Whatsapp Group