पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडसह भोसरी विधानसभा मतदारसंघातीलवाढत्या औद्योगिक व निवासी वीज समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक आहे. नवीन प्रस्तावित विकासकामे आणि पायाभूत प्रकल्पांसाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात येईल. तसेच, वीज पुरवठा सक्षम करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिले.

ऊर्जा विभागाच्या माहितीनुसार पुढील प्रकल्पांना गती दिली जाणार आहे: सफारी पार्क, मोशी येथे अतिउच्चदाब (EHV) उपकेंद्र — मोशी, डुडुळगाव, आकुर्डी, चिखली, तळवडे परिसरातील वीजपुरवठा अधिक स्थिर होणार आहे. चहोली येथे नवीन EHV उपकेंद्र — भोसरी, चहोली, दिघी, धानोरी भागात पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होणार आहे. सेंच्युरी इंका EHV उपकेंद्रात दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव — भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा. मध्यम दाब स्विचिंग स्टेशनसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
भोसरी गावठाणातील ओव्हरहेड वीजवाहिन्या आरडीएसएस योजनेंतर्गत टप्प्याटप्प्याने भूमिगत करण्यात येणार आहेत. तळवडे येथील देवी इंद्रायणी स्विचिंग उपकेंद्रातून स्वतंत्र फीडर व भूमिगत केबल टाकण्याचे काम तातडीने हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे वारंवार होणारे वीजखंडित प्रकार कमी होतील. औद्योगिक उत्पादनात सातत्य राहील. निवासी भागात सुरक्षित आणि स्थिर वीजपुरवठा मिळेल. विशेष म्हणजे, वाढत्या शहरीकरणाचा विचार करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित प्रस्तावांना प्राधान्याने मान्यता देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या शहरीकरणाचा विचार करुन वीज पुरवठा सक्षम करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर पुरवण्याचे आणि महावितरणच्या विविध शाखा कार्यालय देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच झाले आहे. चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित झाला. तसेच, पुनावळे-रावेत- किवळे- वाकड हा रेसिडेन्सिअल कॉरिडॉर वाढतो आहे. दोन्ही कॉरिडॉरमध्ये इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्त्वात भाजपा महायुती सरकारने ठोस निर्णय घेतले आणि कामही सुरू केले आहे. प्रस्तावित कामांना मंजुरी आणि निधीची उपलब्धता करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मुख्यमंत्री साहेब आणि राज्य शासनाचे आभार मानतो.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.






















Join Our Whatsapp Group