पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा पैलवान स्वराज काळभोर याची चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय युनिव्हर्सिटी बीच रेसलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ५ ते ११ मार्च दरम्यान चेन्नई येथे या स्पर्धा पार पडणार आहेत.

स्वराज हा राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक विजेता ठरला आहे. यापूर्वी चंदीगड येथे झालेल्या राष्ट्रीय युनिव्हर्सिटी स्पर्धेत त्याने आपल्या महाविद्यालयाचे नेतृत्व करत उल्लेखनीय कामगिरी केली होती. आता बीच रेसलिंग प्रकारात राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने क्रीडा वर्तुळात त्याचे कौतुक होत आहे.
स्वराजच्या घरातच कुस्तीची समृद्ध परंपरा आहे. त्यांचे आजोबा कै. बाळासाहेब काळभोर तसेच पैलवान रघुनाथ काळभोर हे नावाजलेले मल्ल होते. त्याचे वडील राजेश काळभोर हे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असून पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पैलवान म्हणून त्यांची ओळख आहे. कुटुंबातील या परंपरेचा वारसा स्वराज समर्थपणे पुढे नेत आहे. सध्या स्वराज हा रुस्तम हिंद अमोल बुचडे अकॅडमी, मारुंजी येथे अमोल बुचडे व नरेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. तो सध्या बीटेक (कम्प्युटर सायन्स) चे शिक्षण घेत असून क्रीडा व शिक्षण यांचा उत्तम समतोल साधत आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष हनुमंत गावडे तसेच पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सचिव संतोष माचुत्रे यांनी स्वराजचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या ट्रस्टमधील ज्ञानेश्वर लांडगे व विठ्ठल काळभोर यांनीही त्याचे कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. चेन्नई येथे होणाऱ्या या स्पर्धेत स्वराजकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात असून पिंपरी-चचिंचवड परिसरातील क्रीडाप्रेमी त्याला शुभेच्छा देत आहेत.






















Join Our Whatsapp Group