भोसरी (Pclive7.com):- दिघी रोड, प्रभाग क्रमांक ५ भोसरी येथे सध्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी भोसरी पोलीस स्टेशन (वाहतूक विभाग) यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देत या ठिकाणी वाहतूक पोलीस व होमगार्ड तैनात करण्याची मागणी केली आहे.

जालिंदर शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, दिघी रोडवरील नूर मोहल्ला कॉर्नर परिसरात रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक पोलीस तसेच होमगार्ड यांची नियुक्ती करावी.
नागरिकांचा होणारा त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी व्यक्त केली आहे.



















Join Our Whatsapp Group