नोंदणी झालेल्या सर्व रुग्णांना मिळणार नामांकित रुग्णालयात मोफत उपचार
पिंपरी (Pclive7.com):- सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा महाकुंभ असलेल्या ‘अटल महाआरोग्य शिबिराचा’ यंदाचा सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेल्या ११ वर्षांची गौरवशाली परंपरा कायम राखत, यावर्षी देखील रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांच्या पुढील उपचारांचा आणि शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च शिबिराच्या माध्यमातून उचलला जाणार असल्याची ग्वाही आमदार शंकर जगताप यांनी दिली.

अटल महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने समारोपाच्या प्रसंगी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार उमा खापरे, तांत्रिक सेवा महाराष्ट्र राज्य, (सीआयडी) पोलिस अधीक्षक वैशाली माने, भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पक्षनेते प्रशांत शितोळे तसेच भाजप नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. समारोपाच्या निमित्ताने विविध आरोग्य संस्थांचे प्रतिनिधी, ८५ हून अधिक हॉस्पिटलचे मान्यवर डॉक्टर, परिचारिका, रुग्णालय कर्मचारी आदींचा या निमित्ताने सन्मान करण्यात आला.
आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले हे शिबिर सामाजिक बांधिलकीचा एक व्यापक उपक्रम बनला आहे. गेल्या ११ वर्षांच्या प्रवासात लाखो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ प्राथमिक तपासणी केली जात नाही. उपचारांपासून ते मोठ्या आणि गुंतागुंतीच्या तसेच दिर्घ शस्त्रक्रिया वर सर्व सेवा रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जातात. दिव्यांग आणि वृद्धांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेली साधने आणि औषधे मोफत दिली जातात.
समारोप प्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये प्रामुख्याने मंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार उमा खापरे यांनी उपस्थित राहून रुग्णांशी संवाद साधला व साहित्य वाटपाच्या कार्यात सहभाग घेतला.
पिंपरी-चिंचवडमध्ये अटल महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने ‘HPV’ (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेचा अत्यंत स्तुत्य शुभारंभ करण्यात आला. महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची मानली जाते. या विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील किशोरवयीन मुलींना कर्करोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले.
“अटल महाआरोग्य शिबिर हे आता केवळ एक उपक्रम राहिला नसून, ती सामाजिक बांधिलकीची एक चळवळ बनली आहे. गेल्या ११ वर्षांत आम्ही लाखो गरजूंपर्यंत /पेशंट पोहोचलो आहोत. यंदा नोंदणी झालेल्या लाखो रुग्णांना केवळ सल्ला /चाचण्या देऊन आम्ही थांबणार नाही, तर त्यांच्यावर होणाऱ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा खर्चही मोफत केला जाईल. उपचारांच्या अभावी एकही रुग्ण वंचित राहणार नाही, हाच आमचा संकल्प आहे.”
– शंकर जगताप
आमदार, पिंपरी चिंचवड शहर



















Join Our Whatsapp Group