१४ वर्षांच्या मुलींसाठी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण
पिंपरी (Pclive7.com):- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नवीन सांगवी रुग्णालयात सदर मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये २४ लाभार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.

महापौर रवी लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये १४ वर्षे पूर्ण पण १५ वर्षांखालील मुलींसाठी एचपीव्ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर मोहीम ही पुढील ३ महिने चालणार आहे. HPV ही लस सुरक्षित, प्रमाणित आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी असल्याने पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण वेळेत करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.
एचपीव्ही लसीकरणासाठी पात्र मुलींचे वयोगट..
भारत सरकारच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १४ वर्षांच्या मुली (ज्यांनी १४ वा वाढदिवस साजरा केला आहे पण १५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत) या एचपीव्ही लसीसाठी पात्र आहेत. जगभरात एचपीव्ही लसीचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे, सध्या या वयोगटावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जेणेकरून १५ वर्षांच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींना वेळेत संरक्षण मिळू शकेल.
लसीकरणासाठी अपात्र परिस्थिती..
खालील परिस्थितींमध्ये एचपीव्ही लसीकरण दिले जाणार नाही किंवा पुढे ढकलले जाईल,
* १४ वर्षांच्या लक्ष्य वयोगटाबाहेरील मुली
* पूर्वी एचपीव्ही लस (गार्डासिल किंवा सर्वाव्हॅक) घेतलेली असल्यास
* लस किंवा तिच्या घटकांमुळे (यीस्ट) तीव्र ऍलर्जीचा इतिहास असल्यास
* मध्यम ते गंभीर आजार असल्यास – पूर्णपणे बरे झाल्यानंतरच लसीकरण करावे.
मनपा रुग्णालयांमध्ये विनामूल्य एचपीव्ही लस दिली जाणार..
सर्व मनपा रुग्णालयामध्ये सकाळी ९.३० ते दुपारी २ पर्यंत मोफत लसीकरण सत्र सुरु राहतील. नागरिकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे संचलित यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी; तालेरा रुग्णालय, चिंचवड; नवीन भोसरी रुग्णालय, भोसरी; इंदिरा गांधी प्रसूती गृह ,सांगवी रुग्णालय, सांगवी; नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव; जिजामाता रुग्णालय, पिंपरी तसेच कै.ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, यमुनानगर येथे संपर्क साधून मोफत एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा. तसेच लस घ्यायला येताना आधार, शाळेचे ओळखपत्र ( I card ) तत्सम ओळख पत्र घेऊन आणि भरपेट नाश्ता करून पालकांनी मुलींना घेऊन यावे , असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे
“महिलांच्या आरोग्याचे संरक्षण ही महापालिकेची महत्त्वाची जबाबदारी आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील १४ वर्षांच्या मुलींसाठी ही लस मोफत उपलब्ध करून देत आहे. पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे लसीकरण करून या आरोग्य उपक्रमाला प्रतिसाद द्यावा.”– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका.
“महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एचपीव्ही संक्रमण हे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण असून, योग्य वयात दिलेली एचपीव्ही लस हा त्याविरुद्धचा प्रभावी उपाय आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील मुलींच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी ही मोफत लसीकरण मोहीम राबवत आहे.”
– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.
“एचपीव्ही व्हायरस हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा मुख्य कारणीभूत घटक आहे. योग्य वयात म्हणजे १५ वर्षांपूर्वी दिलेली एचपीव्ही लस मुलींना दीर्घकालीन संरक्षण देते. त्यामुळे पालकांनी १४ वर्षांच्या मुलींचे लसीकरण वेळेत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.”– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका



















Join Our Whatsapp Group