पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेला अखेर पाच महिन्यांनंतर पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडील आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार काढण्यात आला आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची ७ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली झाली होती. त्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मागील पाच महिन्यांपासून हर्डीकर यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार होता.
अतिरिक्त जबाबदारीमुळे केवळ अत्यावश्यक कामांनाच प्राधान्य दिले जात असल्याने महापालिकेचे प्रशासकीय कामकाज काहीसे संथगतीने सुरू असल्याची चर्चा होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून पूर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी होत होती. महापौर रवी लांडगे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी बुधवारी जारी केला.






















Join Our Whatsapp Group