पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे येथील ज्योतिबा नगर परिसरात वॉल कंपाऊंडचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जागा मालक सदाशिव आगळे यांच्या इंडक्शन थर्मल कंपनीच्या खुल्या प्लॉटभोवती विटांचे वॉल कंपाऊंड बांधण्याचे काम सुरू होते. हे काम कंत्राटदार दीपक देवाजी जाधव (रा. चाकण) यांनी घेतले होते. या बांधकामासाठी लेबर नाक्यावरून मजूर आणण्यात आले होते.
काम सुरू असताना अचानक बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळली आणि तिच्या ढिगाऱ्याखाली सचिन शंकर राठोड (वय ३०) आणि त्यांची पत्नी कोमल सचिन राठोड (वय २५, दोघेही मूळ रा. लोहा, जि. नांदेड) दबले. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मनोहर भिकू चव्हाण (वय ३८, रा. चाकण) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर देहूगाव येथील इम्पेरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवले. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात येत आहे.



















Join Our Whatsapp Group